विद्युत जोडणीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती
रत्नागिरी:- तालुक्यातील चाफे येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयात सहाय्यक अभियंत्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत सहाय्यक अभियंता राजेंद्र पवार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर त्यांच्यावर तातडीने उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार प्रसाद गजानन देसाई (रा. मांजरे) यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विद्युत कनेक्शन देण्यावरून राजेंद्र पवार आणि प्रसाद देसाई यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून हा हल्ल्याचा प्रयत्न व धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे. शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या अभियंत्यावर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व चिंतेचे वातावरण पसरले असून संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत असून घटनेचे नेमके कारण आणि तपशील तपासातून स्पष्ट होणार आहेत.








