खेड:- खेड शहरातील कोष्टी आळी परिसरात घराशेजारील मैदानात खेळायला जाणाऱ्या एका मुलाच्या डोक्यावर पाठीमागून लोखंडी रॉडने वार करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बुरखा परिधान केलेल्या एका अनोळखी महिलेविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कोष्टी आळी, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील मैदानात घडली. तेजस उपेंद्र घोडे असे जखमी मुलाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उपेंद्र भिकाजी घोडे (वय ५३ वर्षे, मूळ रा. खेड पोलीस स्टेशनच्या बाजूला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खेड; सध्या रा. कोष्टी आळी, खेड) यांचा मुलगा तेजस हा घराच्या बाजूला असलेल्या मैदानात खेळण्यासाठी जात होता. यावेळी पाठीमागून कोणीतरी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केल्याने तो जखमी होऊन खाली कोसळला.
नेमक्या त्याच वेळी फिर्यादी यांचा मोठा मुलगा ओम मैदानात जात असताना त्याला तेजस जखमी अवस्थेत खाली पडलेला दिसला. त्याने आरडाओरडा करताच जवळच उभी असलेली एक बुरखाधारी अनोळखी महिला (नाव व गाव अज्ञात) तेथून पळून गेली.
या घटनेप्रकरणी उपेंद्र घोडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.४५ वाजता गु.र.नं. ३५९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) नुसार अनोळखी बुरखाधारी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून खेड पोलीस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत.









