गादी कारखाना व जनरल स्टोअर जळून ६ लाखांचे नुकसान
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील नुरानी गादी कारखाना व त्याच्या बाजूचे आर्य जनरल स्टोअर दुकानाला बुधवारी मध्यरात्री अचानकपणे आग लागून तब्बल 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवार 25 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2.30 वा.सुमारास घडली आहे.
याबाबत अकबर मोहम्मद नदाब (49, रा.खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,त्यांचा कारवांचीवाडी येथे नुरानी नावाचा गादी कारखाना आहे. त्या कारखान्याला गुरुवारी मध्यरात्री अचानकपणे आग लागून 250 नग गादी,250 नग उशी, 8 लोखंडी रॅक, 4 प्लास्टिक खुर्च्या,1 शिलाई मशिन, शटर, कारखान्याच्या छताचे पत्रे, विजेच्या वायर, 2 फॅन, गादीचे चेक्स असलेले 600 मिटर कापड, असे अंदाजे 3 लाख 50 हजारांचे नुकसान झाले. तसेच या गादी कारखान्याची आग बाजुच्या आर्य जनरल स्टोअर्स या दुकानात पसरल्यामुळे त्या दुकानातील फर्निचर,काउंटर, विजेच्या वायर, तसेच दुकानातील माल जळून दुकान मालक आर्य पुसाळकर यांचे 2 लाख 50 हजारांचे नुकसान झाले. या दोन्ही दुकानांचे मिळून एकूण 6 लाखांचे नुकसान झालेले आहे.
ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी गुरुवारी सायंकाळी जाउन पंचनामा केला. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आगीचे नेमके कारण समजून शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार प्रविण पाटील करत आहेत.









