Thursday, November 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळुणात १.३८ लाखांची गांजाची झाडे जप्त

चिपळुणात १.३८ लाखांची गांजाची झाडे जप्त

पिंपळी खुर्द येथील सॉ मिलच्या आवारात विनापरवाना लागवड; तरुण ताब्यात

चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण तालुक्यात धडक कारवाई केली आहे. पिंपळी खुर्द येथील एका सॉ मिलच्या आवारात विनापरवाना गांजाच्या झाडांची लागवड व जोपासना करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची ५.५३२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी खुर्द येथील ‘पटेल सॉ मिल’च्या आवारात एनडीपीएस कायद्यान्वये छापा टाकण्यात आला. यावेळी सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणारा अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, पो. कुचेरा, तहसील मिल्कीपूर, जि. अयोध्या, उत्तर प्रदेश) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा (कॅनॅबिस) या अंमली पदार्थाच्या वनस्पतींची विनापरवाना लागवड करून त्यांची जोपासना करत असल्याचे आढळून आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष सदर गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांचे एकूण वजन ५.५३२ किलो ग्रॅम व किंमत १ लाख ३८ हजार ३०० रुपये इतकी आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चिपळूण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांचा समावेश होता.