चिपळूण:- तालुक्यातील गोवळकोट येथे अवघ्या तीन दिवसांच्या नवजात स्त्री जातीच्या बालकाचा अचानक हालचाल बंद होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवळकोट येथील निदा अब्बास दळवी यांनी सोमवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास आपल्या तीन दिवसांच्या नवजात मुलीला दूध पाजून झोपवले होते. त्यानंतर पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्यांनी बाळाकडे पाहिले असता, बाळाची कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घाबरलेल्या निदा दळवी यांनी तातडीने ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी बाळाला तात्काळ उपचारासाठी चिपळूण येथील डॉ. खेडकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी बाळाची तपासणी करून उपचार केले; मात्र बाळाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी तपासून बाळाला मृत घोषित केले.
याप्रकरणी तौसिफ इक्बाल दळवी यांनी दिलेल्या खबरीवरून चिपळूण पोलिसांनी सोमवारी सकाळी १०.३६ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









