Thursday, November 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कौटुंबिक वादातून मेहुण्याला फुकणीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून मेहुण्याला फुकणीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात मेहुण्याला लोखंडी फुकणीने डोक्यात सात ते आठ वेळा मारून जखमी केल्याची घटना दाभिळवाडी-गोळप येथे घडली. याप्रकरणी गौरव गिरीश पावसकर (वय ४५) आणि गिरीश शशिकांत पावसकर (वय ४८, दोघेही रा. दाभिळवाडी, पावस, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

याबाबत विराज विश्वनाथ पावसकर (वय ३६, व्यवसाय खासगी चालक, रा. दाभिळवाडी, गोळप) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सुयोग विश्वनाथ पावसकर याच्यासोबत आरोपींचा मुलगा अनुश हा गोळप-सुतारवाडी येथे गेला होता. याचा राग मनात धरून संशयित गिरीश पावसकर याने फिर्यादी यांच्या भावाच्या सासरी जाऊन फिर्यादी, त्यांचा भाऊ तसेच त्यांचे सासरे संजय वैद्य, सासू शुभदा वैद्य आणि पत्नी भावना यांना शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर संशय़ित घरी परतल्यानंतर पुन्हा फिर्यादी आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करू लागले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. त्याचदरम्यान संशय़ित गौरव पावसकर याने स्वयंपाकघरातून लोखंडी फुकणी आणून फिर्यादी यांच्या डोक्यात सात ते आठ वेळा मारहाण केली. या हल्ल्यात विराज पावसकर जखमी झाले. या प्रकरणी मंगळवारी (ता. २४) रात्री साडेआठ वाजता पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पूर्णगड पोलिस करीत आहेत.