Wednesday, November 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पुर येथे बैलांची अवैध वाहतूक करणारी पिकअप पलटी

पुर येथे बैलांची अवैध वाहतूक करणारी पिकअप पलटी

दोघांवर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- पुर ते देवरुख मार्गावर पुर वेलेवाडी (ता. संगमेश्वर) येथे बैलांची क्रूरपणे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन बैल जखमी झाले असून, याप्रकरणी दोघा संशयितांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​तेजस विजय सातपुते (वय २५) आणि संकेत शिवाजी सातपुते (वय ३२, दोघेही रा. डोणोली मातंग वसाहत, पो. भाडळे, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संशयित बोलेरो पिकअप (क्र. MH10BR 4969) मधून दोन बैलांची वाहतूक करीत होते. बैलांना यातना होतील अशा पद्धतीने आखुड दोरीने मानेला बांधून गाडीत दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. तसेच, हवा खेळती राहण्याची सोय न करता गाडी चारही बाजूंनी बंदिस्त केली होती. वाहतुकीसाठी आवश्यक असलेले परवाने, वैद्यकीय प्रमाणपत्र, चारा-पाणी, प्रथमोपचार पेटी, पार्टिशन तसेच वाहतुकीचा फलक नसताना ही वाहतूक सुरू होती.

​दरम्यान, पुर ते देवरुख रस्त्यावरून भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवल्याने पुर वेलेवाडी येथे पिकअप रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात संशयित तसेच गाडीतील दोन बैल जखमी झाले. एका बैलाचे उजवे शिंग तुटले असून, पोट व मागील पायाच्या खुराजवळ जखम होऊन रक्तस्त्राव झाला आहे.

​याप्रकरणी किरदाडीचे पोलीस पाटील निलेश श्रीनिवास पेंडनेकर (वय ४०, रा. किरदाडी उगवतीवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री १०.११ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो पिकअप (काळ्या-निळ्या ताडपत्रीसह) आणि ६ हजार व ८ हजार रुपये किमतीचे दोन बैल असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.