Wednesday, November 25, 2026
spot_img
Home संगमेश्वर निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमेश्वर:- तालुक्यातील साडवली येथील मतदान केंद्राच्या मतदान यादीच्या कामकाजात टाळाटाळ करून शासकीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश प्रकाश झेपले (शिक्षक, जि. प. शाळा साडवली; रा. झेपलेवाडी-पूर, सह्याद्री नगर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, संगमेश्वर यांच्या आदेशान्वये आरोपी संदेश झेपले यांची साडवली येथील मतदान केंद्र भाग क्रमांक २८३ साठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पंचायत समिती संगमेश्वरच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत नियुक्तीचा आदेश बजावूनही त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला नाही.

तसेच, संगमेश्वर तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याबाबत वारंवार सूचना देऊन व संपर्क साधूनही त्यांनी नोंदणी केली नाही. याशिवाय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसलाही त्यांनी कोणताही खुलासा सादर केला नाही. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज २ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत टाळून त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी मंडळ अधिकारी (कोसंब) तथा पर्यवेक्षक संयोगिता जनार्दन बावणे (वय ४६, रा. रेडीज कॉम्प्लेक्स, देवरुख; मूळ रा. भोगम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री ८.५० वाजता लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.