नारळ काढताना महावितरणच्या मुख्य वाहिनीला लोखंडी पानकाप्याचा स्पर्श झाल्याने दुर्घटना
दापोली:- नारळाच्या झाडावरून नारळ काढत असताना महावितरणच्या मुख्य विद्युतवाहक तारेचा स्पर्श होऊन विजेचा तीव्र धक्का बसल्याने उंबर्ले गावचे पोलीस पाटील संतोष बाळू नाचरे (वय ५०, रा. उंबर्ले गाववाडी, ता. दापोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत संतोष नाचरे हे आपले वडिल बाळू गोविंद नाचरे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावरून नारळ काढत होते. वडिलांनी झाडाला लावलेली लोखंडी शिडी खाली धरली होती, तर संतोष हे शिडीवर चढून हातातील लोखंडी पानकाप्याने नारळ काढत होते. दरम्यान, शिडीवरून त्यांचा अचानक तोल गेला. या गडबडीत त्यांच्या हातातील लोखंडी पानकापा झाडाजवळून जाणाऱ्या महावितरणच्या पोलवरील मुख्य विद्युतवाहक तारेला चिकटला. यामुळे संतोष यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते थेट जमिनीवर कोसळले.
मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे पाहून वडिलांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील अजय सणस, प्रतिक जाधव आणि इतर ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी संतोष यांना हलवून पाहिले असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना रिक्षाने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना सायंकाळी ६ वाजता मृत घोषित केले.
गावातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील अशा प्रकारे अपघातात मृत्युमुखी पडल्याने उंबर्ले व परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (क्रमांक ९२/२०२६) नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









