Saturday, November 21, 2026
spot_img
Home दापोली खेर्डी येथे एसटी बस- दुचाकीचा भीषण अपघात; स्वाराचा मृत्यू

खेर्डी येथे एसटी बस- दुचाकीचा भीषण अपघात; स्वाराचा मृत्यू

दापोली:- दापोली-मंडणगड राज्यमार्गावरील खेर्डी येथे शनिवारी सकाळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेंद्र गोरिवले (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, रा. कलकाई कोंड, दापोली) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, सकाळच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण दापोली परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मंडणगडहून दापोलीच्या दिशेने एक एसटी बस येत होती, तर त्याच वेळी सुरेंद्र गोरिवले हे आपल्या दुचाकीवरून दापोलीहून मंडणगडच्या दिशेने प्रवास करत होते. खेर्डी परिसरात समोरून आलेली दुचाकी थेट एसटी बसच्या मागील चाकाखाली गेल्याने हा भीषण अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की सुरेंद्र गोरिवले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून, नेमका हा अपघात कसा घडला याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. खेर्डी येथील या भीषण अपघातामुळे दापोली-मंडणगड मार्गावरील वाहनचालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.