Sunday, November 22, 2026
spot_img
Home दापोली कुंभवे येथे काजूच्या बागेला अज्ञाताकडून आग

कुंभवे येथे काजूच्या बागेला अज्ञाताकडून आग

७२० झाडे व पाईपलाईन जळून १५ लाखांचे नुकसान

दापोली:- तालुक्यातील कुंभवे येथील एका आठ एकर काजूच्या बागेतील वाळलेल्या गवताला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने १५ वर्षांपूर्वी लागवड केलेली सुमारे ७२० काजूची झाडे आणि सिंचनाची पीव्हीसी पाईपलाईन पूर्णपणे होरपळून खाक झाली आहे. या आगीत बागायतदाराचे सुमारे १५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळोली (ता. दापोली) येथील रहिवासी हेमंत नामदेवराव नगराळे यांच्या मालकीची कुंभवे येथे सुमारे आठ एकर काजूची बाग आहे. या बागेच्या देखभालीचे काम करणारे दयानंद गोविंद सुके (वय ५२, मूळ रा. लिपणीवावे, ता. म्हसळा, जि. रायगड; सध्या रा. साखळोली, ता. दापोली) हे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता बागेची पाहणी करून परतले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते पुन्हा देखभालीच्या कामासाठी बागेत गेले असता, संपूर्ण बागेतील वाळलेले तण जळालेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बागेची बारकाईने पाहणी केली असता, सुमारे १५ वर्षांपूर्वी लागवड केलेली १० लाख रुपये किमतीची ७२० काजूची झाडे आणि बागेतील पाण्यासाठी टाकलेली ५ लाख रुपये किमतीची पीव्हीसी पाईपलाईन पूर्णपणे जळून होरपळल्याचे दिसून आले. कोणीतरी अज्ञात इसमाने बागेतील वाळलेल्या गवताला आग लावल्याने एकूण १५ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी दयानंद सुके यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५५ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२६ (फ) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २५३/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.