कशेडी ओझरवाडी येथील घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ओझरवाडी मार्गावर पायी चालत जाणाऱ्या एका अनोळखी वृद्ध इसमास भरधाव बोलेरो पिकअपने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कशेडी ओझरवाडी हायवेवर, ता. खेड येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाचा एक अनोळखी पुरुष इसम (नाव व गाव अज्ञात) महामार्गावरून पायी जात होता. यावेळी आरोपी नितीन सदाशिव कदम (वय ३७ वर्षे, रा. खडपोली कदमवाडी, ता. खेड) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्र. MH-08-BK-0954) घेऊन मुंबई ते गोवा लेनवरून जात होता. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता त्याने निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून पायी जाणाऱ्या अनोळखी इसमास जोरदार धडक दिली.
या धडकेत त्या अनोळखी वृद्धाच्या डोक्याला, पोटाला तसेच दोन्ही पायांवर गंभीर व किरकोळ दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी कशेडी येथील पोलीस पाटील स्वरा समीर गावणकर (रा. कशेडी गावणकरवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.४८ वाजता गु.र.नं. ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार चालक नितीन सदाशिव कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









