Saturday, November 21, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूणच्या दोघांचा अपघातात मृत्यू; तिघे जखमी

चिपळूणच्या दोघांचा अपघातात मृत्यू; तिघे जखमी

सातारा-पुणे महामार्गावरील दुर्घटना; कार दुभाजकाला धडकून तीन वेळा उलटली

चिपळूण:- मुंबईहून चिपळूणकडे परतत असताना सातारा-पुणे महामार्गावरील सुरूर येथे कारचा भीषण अपघात झाला. चालकाला प्रवासादरम्यान डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगतच्या दुभाजकाला धडकली आणि तीन वेळा पलटी झाली. या दुर्घटनेत चिपळूण येथील दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

वैभव वामन कदम (वय ४५) हे मुंबईहून चिपळूणच्या दिशेने आपल्या कुटुंबीयांसह कारने प्रवास करीत होते. सातारा-पुणे महामार्गावर सुरूर परिसरात पोहोचताच चालकाला झोपेची डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकाला जोरदार धडकली. धडकेनंतर कार तीन वेळा पलटी झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर आतील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

या अपघातात वैष्णवी वैभव कदम (४३) आणि विजय धोंडू पवार (७०), दोघेही चिपळूण येथील रहिवासी, यांचा मृत्यू झाला. तर कारचालक वैभव कदम, वैशाली विजय पवार (६२) आणि वेदांत वैभव कदम (१३) हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुंबईहून चिपळूणकडे सुरू असलेला प्रवास सुरूर येथे काळाच्या घाल्याने दुर्दैवी ठरला. एकाच कुटुंबातील प्रवासावर या अपघाताने दुःखाची छाया पसरली असून, दोन जणांच्या मृत्यूमुळे चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.