५,७६० रुपयांचा मद्यसाठा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर रेल्वेस्थानकासमोरील मौजे सोल्ये येथील एका चायनिज सेंटरच्या पाठीमागील शेडखाली बेकायदेशीररीत्या गोवा आणि महाराष्ट्र बनावटीचा मद्यसाठा बाळगणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीवर राजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या व बिअरचे डबे असा एकूण ५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४१ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मौजे सोल्ये, राजापूर रेल्वेस्थानकासमोर असलेल्या ‘हॉटेल सिद्धेश चायनिज सेंटर’च्या पाठीमागील बाजूच्या शेडखाली नितीन राजाराम शिंदे (वय ५५, रा. सोल्ये, राजापूर रेल्वेस्थानकासमोर, ता. राजापूर) हा विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या मद्यसाठा स्वतःच्या ताब्यात बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून झडती घेतली असता, तेथे गोवा व महाराष्ट्र बनावटीचा मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी ६३० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या बॉब्स लेमन व्होडका कंपनीच्या १८० मि.ली. मापाच्या २१ प्लास्टिक बाटल्या, २४० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या हनी ब्लेंड प्युअर ब्रँडीच्या १८० मि.ली. मापाच्या ८ बाटल्या, ७५० रुपये किमतीच्या महाराष्ट्र बनावटीच्या मास्टर्स डिलाइट प्रिमियम व्हिस्कीच्या १८० मि.ली. मापाच्या ५ बाटल्या, २ हजार ४६० रुपये किमतीच्या टुबॉर्ग स्ट्रॉंग बिअरच्या ६५० मि.ली. मापाच्या १२ काचेच्या बाटल्या आणि १ हजार ६८० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर प्रिमियम स्ट्रॉंग बिअरचे ५०० मि.ली. मापाचे १२ टिनचे डबे असा एकूण ५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष लुमाजी लांडे यांनी १९ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजता फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी नितीन राजाराम शिंदे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०५/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.









