Sunday, November 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

देवरुख तेलीवाडीत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

देवरुख:- जुन्या वादाचा व तक्रारीचा राग मनात धरून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाला वाटेत अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना देवरुख तेलीवाडी येथे घडली आहे. या मारहाणीत तरुणाच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हरिश्चंद्र किर्वे (वय ३७, व्यवसाय चालक, रा. देवरुख तेलीवाडी, ता. संगमेश्वर) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नटेवाडी हरपुडे ते तेलीवाडी जाणाऱ्या रोडवर गणपती विसर्जन घाटापुढील गल्लीमध्ये घडली. रोहित किर्वे हे आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून घरी जात असताना समीक्षा सतिष किर्वे आणि सुगंधा सुरेश किर्वे यांनी त्यांना वाटेत अडवले आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर व मानेवर मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सतिष सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे (सर्व रा. तेलीवाडी, देवरुख) हे देखील त्या ठिकाणी धावून आले. या सर्वांनी मिळून रोहित यांना लाकडी काठीने कमरेवर, दोन्ही हातांवर आणि पाठीवर बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जमिनीवर खाली पाडून छातीवर लाथ मारून जखमी केले. या हल्ल्यात रोहित यांच्या उजव्या हाताला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे.

या प्रकरणी रोहित किर्वे यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीक्षा सतिष किर्वे, सुगंधा सुरेश किर्वे, सतिष सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे या पाच जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(२), १८९, १९०, १९१, ३५१ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १७५/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.