Sunday, November 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गोडावूनसमोरून ९० हजारांची कंडक्टर वायर लंपास

गोडावूनसमोरून ९० हजारांची कंडक्टर वायर लंपास

खेड लवेल येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील लवेल येथील ‘लीना पॉवरटेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या गोडावूनसमोरील मोकळ्या आवारात ठेवलेली तब्बल ९० हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम कंडक्टर वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. कंपनीच्या लवेल येथील गोडावूनसमोरील मोकळ्या जागेत लाकडी ड्रममध्ये (टूम) गुंडाळून ठेवलेली ३,८०० मीटर लांबीची जुनी वापरती पिळ मारलेली ॲल्युमिनियम कंडक्टर वायर अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. चोरीस गेलेल्या या वायरची अंदाजे किंमत ९० हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी अखिलेशकुमार श्रीलालताप्रसाद प्रजापती (वय ४८, रा. चिखले अपार्टमेंट, हनुमानपेठ, गांधीचौक, ता. खेड; मूळ रा. विरार पूर्व, जि. पालघर) यांनी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३३ वाजता खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ३५७/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या चोरीचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.