रत्नागिरी:- शहरातील विश्वनगर परिसरातील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीसमोर असलेल्या सुनील. सुवरे यांच्या घराला गुरूवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागली. देवघरातील तेवत्या दिव्यामुळे लागलेल्या या आगीत घरातील साहित्याचे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आणि स्थानिक तरुणांनी तात्काळ धाव घेत शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे आग आटोक्यात आली आणि अनर्थ टळला. हे घर सुनिता सुभाष सुवरे यांच्या मालकीचे आहे.
सायंकाळच्या सुमारास देवघरातील दिव्यामुळे घरात अचानक आगीने पेट घेतला आणि काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात सर्वांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. यावेळी स्थानिक तरुण प्रवीण वाघेला, घोसाळे, सूरज पवार, संकेत कांबळे, नरेश मोहिते आणि स्वरूप जाधव यांनी अग्निशमन
जवानांच्या खांद्याला खांदा लावून मदत केल्याने आग विझवण्यात यश आले; या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुवरे कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले.









