Wednesday, October 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्समध्ये चोरीचा प्रयत्न

फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्समध्ये चोरीचा प्रयत्न

रत्नागिरी:- तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फिनोलेक्स कॉलनी फेज-०३ मधील आकाश इमारतीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिमल मुरारीसहाय वर्मा (वय ४९, मूळ रा. वास्को, गोवा, सध्या रा. रूम नं. डी-१०, फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिनोलेक्स कॉलनी फेज-०३ मधील आकाश इमारतीच्या तळमजल्यावरील रूम क्रमांक ७४ आणि रूम क्रमांक ७५ हे दोन्ही फ्लॅट्स बंद होते. शनिवार, १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या बंद घरांना लक्ष्य केले. चोरट्याने चोरीच्या उद्देशाने धारदार अथवा लोखंडी हत्याराने दोन्ही रूमचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात घरातून कोणताही ऐवज चोरीला गेलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिमल वर्मा यांच्या फिर्यादीवरून पूर्णगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ आणि ६२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वसाहतीत अशा प्रकारे घरफोडीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.