रत्नागिरी:- घरात कोणीही नसल्याची संधी साधून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश करण्याचा आणि घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना खेडशी येथील स्वरूपानंद वसाहतीत घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जलील अब्दुल्ला सोलकर (वय ६२, रा. जामा मशीदजवळ, कर्ला, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही मालमत्ता चोरीला गेली नसल्याची नोंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सी. अर्चना संतोष पवार (वय ४९) यांचा खेडशी येथील गयाळवाडी फाट्याजवळ, स्वरूपानंद वसाहतीत परिचय बंगला आहे. १० ऑक्टोबर रोजी रात्री १०.२३ वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत संशयिताने बंगल्याच्या पुढील दरवाजाचा कोयंडा तोडून दरवाजा उचकटला आणि घरात प्रवेश करून घरफोडीच्या उद्देशाने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५(अ) आणि ६२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.









