रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरून जयगड ते कर्नाटकच्या दिशेने निघालेला एक मालवाहू ट्रक तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास तालुक्यातील कापडगाव कोठारेवाडी स्टॉप येथील उतारावरील वळणावर घडली. या अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील विजय मल्लिकार्जुन (वय २८, रा. कन्नूर, पोस्ट जेवरगी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हा चालक आपला ट्रक (क्रमांक के.ए. २८ ए.बी. ०२०७) घेऊन जयगड येथून कर्नाटकच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गाने जात होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रक कापडगाव कोठारेवाडी स्टॉप नजीकच्या तीव्र उतारावर आला असता, वळणाचा अंदाज न आल्याने आणि वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, हा अवजड ट्रक महामार्गावरील वळणावरच पलटी झाला.
हा अपघात इतका भीषण होता की ट्रक पलटी झाल्यानंतर चालक विजय मल्लिकार्जुन यांच्या पोटाला अत्यंत गंभीर दुखापत झाली. त्यातच अतिरक्तस्राव आणि गंभीर जखमांमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. कापडगाव कोठारेवाडी येथील पोलीस पाटील सौ. मुग्धा दामोदर कांबळे (वय ५१) यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.
या प्रकरणी पोलीस पाटील सौ. मुग्धा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस आणि वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत चालकाविरुद्धच हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









