मटका चालवणारे दोघे जाळ्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यात बेकायदेशीर जुगाराविरोधात स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मटका जुगार चालवणाऱ्या दोघांवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करून नगद रक्कमेसह जुगार साहित्य जप्त केले आहे.
मंडणगड शासकीय गोडावूनच्या पाठीमागे विनापरवाना मटका जुगार खेळवला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:५२ वाजता या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सचिन गोविंद दिवेकर (वय ४२, रा. मु.पो. पाट धुत्रोली, मंडणगड) आरोपी हा लोकांकडून पैसे स्वीकारून कल्याण मटक्याचा जुगार खेळवताना रंगेहात सापडला.पोलिसांनी २,२०० रुपयांची रोख रक्कम आणि इतर जुगार साहित्य असा एकूण २,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार विनायक अनिरुद्ध राजवैद्य यांच्या फिर्यादीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेपीन बारच्या बाजूला सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची धडक. दापोली एस. टी. स्टँड समोरील स्वागत हॉटेलच्या पाठीमागे आणि स्टेपीन बारच्या बाजूला सुरू असलेल्या बेकायदेशीर मटक्यावर दापोली पोलिसांनी कारवाई केली आहे. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३५ वाजता हा छापा टाकण्यात आला.
आरोपी तुकाराम नारायण जुवळे (वय ३५, रा. मौजे दापोली, आदर्श शाळेच्या मागे, दापोली)
कारवाई: आरोपी लोकांकडून मटक्यासाठी पैसे स्वीकारून विनापरवाना जुगार खेळवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून १,०५० रुपयांची रोख रक्कम व जुगार साहित्याचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सुरेश आंबवणे यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू असून नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.









