राजापूर:- शहरातील खडपेवाडी परिसरातील एका घरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या तीन पत्ती मटका जुगार अड्ड्यावर राजापूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि जागा उपलब्ध करून देणाऱ्या घरमालकासह सहा जणांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून ५ हजार ७९५ रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडपेवाडी येथील विलास केरू पवार (वय ७६, सेवानिवृत्त) यांच्या घरात विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांवर तीन पत्ती जुगार खेळवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास पोलीस पथकाने अचानक छापा टाकला. त्यावेळी टेबलावर पत्त्यांचे कॅट मांडून पैशांच्या पैजा लावून तीन पत्ती जुगार खेळताना समीर रविकांत शिंदे (वय ४२, चालक, रा. वरचीपेठ), वीरेंद्र विठ्ठलराव देसाई (वय ४३, नोकरी, रा. वरचीपेठ), गजाननप्रसाद विठ्ठल कोळवणकर (वय ३९, चालक, रा. साईनगर), दीपक महादेव पवार (वय ३८, दुकानचालक, रा. शीळ नागरेकरवाडी), मंगेश शंकर ढवळे (वय ५०, रिक्षाचालक, रा. दिवटेवाडी) आणि घरमालक विलास केरू पवार हे सहा जण रंगेहात मिळून आले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सहाही जणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या चलनातील एकूण ५ हजार ७९५ रुपयांची रोकड मिळून आली. याशिवाय टेबलावर पडलेले ५२ पानांचे ३ पत्त्यांचे कॅट, दोन पेन आणि जुगाराची आकडेमोड लिहिलेली एक वही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस शिपाई संग्राम कृष्णात नरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









