Monday, October 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जिल्ह्यात संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांवर कारवाई

जिल्ह्यात संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांवर कारवाई

चिपळूण, संगमेश्वर, लांजा येथे तिघांवर दाखल

रत्नागिरी:- जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा या तीन वेगवेगळ्या तालुक्यांत चोरीच्या उद्देशाने किंवा संशयास्पद रित्या फिरणाऱ्या तीन जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते मराठी शाळेजवळ ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सूर्योदयापूर्वीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेऊन व स्वतःचे अस्तित्व लपवून संशयितरित्या चोरीच्या उद्देशाने उभा असलेला अर्जनकमार बाल्मिकी सहा (वय २७, रा. पंडीतपुर, जि. गोपाळगंज, बिहार) हा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश मनोहर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​संगमेश्वर ते देवरुख जाणारेरोडलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मनोजकुमार रामप्रकाश (वय ३२, मूळ रा. रुदलापूर, जि. सिद्धार्थनगर, सध्या रा. शास्त्रीपुल, संगमेश्वर) हा व्यक्ती सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या आडोशाला लपून फिरत असताना आढळला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. संकेत सोपान आटोळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​
​लांजा बाजारपेठेतील कोत्रे हॉटेलजवळ (मुंबई-गोवा महामार्ग शेजारी, गोंडेसखल रोड) ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:५० वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. लांजा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अनंत राजाराम रेवाळे (वय ३५, रा. गवाणे, ता. लांजा) हा रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरताना पोलिसांना मिळाला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोशि नितेश नवनाथ राणे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.