रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण आज सभा
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नूतन इमारतीमधील समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या अध्यक्ष शिल्पा प्रशांत सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असून यामध्ये शहरातील विविध विकासकामे, नगर पथविक्रेता योजना आणि स्वच्छता अभियानाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.
सभेच्या सुरुवातीला दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले जाईल. तसेच महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५८/२ अन्वये ज्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, ती कामे सभेसमोर जाहीर केली जाणार आहेत.
स्थानिक प्राधिकरण व नगर पथविक्रेता समितीशी सल्लामसलत करून पथविक्रेता योजनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर या सभेत निर्णय घेतला जाईल. याशिवाय रत्नागिरी शहरातील कांबळेवाडी, नवानगर, पांढरा समुद्र परिसर तसेच मुरुगवाडा नाका येथील नागरी सुविधांच्या कामांच्या कार्यालयीन अहवालावर निर्णय होणे अपेक्षित आहे.
‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असणारा १०% स्वहिस्सा स्वच्छ भारत मिशन प्रोत्साहन अनुदानातून उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाईल. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो व इतर अनुषंगिक कामे (खुले नाट्यगृह)’ पूर्ण झाल्यानंतर पुढील ५ वर्षांसाठी त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे (O&M) काम कंत्राटदार मे. स्टुडिओ वन यांच्याकडे सोपवण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील मांडवी समुद्रकिनारा व पार्किंग परिसरातील स्वच्छता व सफाई कामांचा अहवाल सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात येईल. यासोबतच, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती राकेश चंद्रकांत नागवेकर यांच्या अर्जानुसार रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये ‘स्वच्छ प्रभाग स्पर्धा’ आयोजित करण्यावर निर्णय घेतला जाईल.
नगर परिषदेच्या विविध विभागांमधील कामांना मुदतवाढ देणे, नवीन विकासकामांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देणे आणि मागवण्यात आलेल्या विविध निविदांवर निर्णय घेणे हे विषय पटलावर असतील. याशिवाय श्रीमती नयना श्रीपाद पाडाळकर यांचे नळ कनेक्शन चालू ठेवणे, प्रिंटर्सचे थकीत देयक अदा करणे व बजेट तरतुदीत वाढ करणे, आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.









