मटका चालवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील काळबादेवी भागात रेशन दुकानामागच्या परिसरात विनापरवाना मटका जुगार खेळवणाऱ्या एका संशयितावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १ मिनिटाच्या सुमारास काळबादेवी येथील रेशन दुकानामागच्या बाजूस असलेल्या नारळाच्या झाडाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी जगदीश प्रभाकर मयेकर (वय ५१, रा. काळबादेवी मयेकरवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा लोकांकडून पैसे स्वीकारून गैरकायदेशीररीत्या विनापरवाना मटका जुगार खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस हवालदार भैरवनाथ ब्रम्हदेव सवाईराम (वय ४०, नेमणूक पोहेकॉ/१३६२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी नोंद करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १,७५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे; ज्यामध्ये १,७५० रुपये रोख रक्कम आणि ५ रुपये किमतीचे निळ्या शाईचे बॉलपेन समाविष्ट आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









