Wednesday, August 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून फसवणूक

दापोलीत श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालक मंडळासह १३ जणांवर गुन्हा दाखल

दापोली:- दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. उपजिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या लेखापरिक्षणात हा अपहार उघडकीस आला आहे. ही घटना सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ दरम्यान दापोली, जि. रत्नागिरी येथे घडली.

या प्रकरणी श्रीम. श्रीया जीवन झगडे (वय ४२ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. करजगाव, ता. दापोली) यांच्या फिर्यादीवरुन प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटीया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळुराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम केळेकर (सर्व रा. दापोली, जि. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मा. उपजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांच्या १४ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशान्वये श्रीया झगडे यांनी श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे लेखापरिक्षण केले होते. या तपासणीमध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर संचालक, व्यवस्थापक आणि कर्ज अधिकारी यांनी आपसात संगनमत करून फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचे समोर आले.

कर्जासाठी स्वीकारलेली कागदपत्रे बनावट असल्याचे माहीत असूनही त्याआधारे कर्जे मंजूर करण्यात आली. तसेच संस्थेच्या उपविधीतील नियमांचा भंग करून कर्जवाटप करण्यात आले. ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवींची दिशाभूल करून त्यांना आर्थिक गैरहानी पोहोचवण्याच्या उद्देशाने हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी श्रीया झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (आणि संबंधित जुन्या कलमांनुसार) कलम ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४६, १४७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.