दापोली:- तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. १० जुलैला दापोली पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडिता गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संशयित निखिल पांडुरंग चोगले (वय २७) याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादेनुसार, जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत संशयिताने अल्पवयीन पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यातून पीडित गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा पोक्सोचा गुन्हा आहे.









