संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात एका अनोळखी प्रवाशाने रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून, वाटेत निर्जन स्थळी त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २९ जून रोजी सायंकाळी मोर्डे खिंड परिसरात घडली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाराम तुकाराम शिंदे (वय ६३, रा. कोंडगाव शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) असे लुटले गेलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगाराम शिंदे हे रिक्षा चालक आहेत. २९ जून रोजी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ च्या सुमारास त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला आणि रिक्षाचे भाडे असल्याचे सांगून त्यांना बोलावून घेतले. त्यानुसार शिंदे त्या व्यक्तीला रिक्षात घेऊन मोर्डे खिंड ते ढवळवाडी रस्त्यावरून जात होते.
रिक्षा मोर्डे खिंडपासून सुमारे २०० मीटर अंतरावर पोहोचली असता, संबंधित प्रवाशाने रिक्षा थांबवायला सांगितली. गाडी थांबताच, मागच्या सीटवर बसलेल्या त्या अनोळखी चोरट्याने अचानक शिंदे यांच्या गळ्यावर हात टाकला आणि गळ्यातील सोन्याची चैन जोरात हिसका मारून खेचली. या झटापटीत चोरट्याने ३५,००० रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (ज्यामध्ये बदाम आकाराचे पान असलेले डिझाइन आहे) लंपास केली आणि रिक्षातून खाली उतरून तातडीने पळ काढला.
या घटनेनंतर फिर्यादी गंगाराम शिंदे यांनी ३० जून रोजी पहाटे ५.०८ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आता अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.









