राजापूर मिळंद येथील घटना
राजापूर:- सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून, तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना राजापूर तालुक्यातील दोन महिला अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराची मौजे जवळेथर येथे वडिलोपार्जित जमीन आहे.सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव नसल्याने त्यांनी फेरफारासाठी अर्ज केला होता.याप्रकरणी १३ मे रोजी मिळंद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल संजना नंदकुमार माने (वय ४१) यांची भेट घेतली असता, फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी पूनम जससिंग गावीत (वय ३७) यांनी २५,००० रुपये मागितल्याचे सांगून कोतवाल माने यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली.
तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १४ मे २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात कोतवाल माने यांनी मंडळ अधिकारी गावीत यांच्यासाठी २०,००० रुपये लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचून मिळंद तलाठी कार्यालयात पंचासमक्ष कोतवाल संजना माने यांनी २०,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर आरोपी क्र. २ मंडळ अधिकारी पूनम गावीत यांना फोनवरून याबाबत कळवताच त्यांनी संमती दर्शवली. यामुळे एसीबीच्या पथकाने दोघींनाही ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे, सपोफौ उदय चांदणे,पोहवा विशाल नलावडे,दीपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार, राजेश गावकर, मपोकॉ वैशाली धनवडे, समिता क्षीरसागर व चालक पोहवा प्रशांत कांबळे यांचा समावेश होता. सध्या राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.









