मिरकरवाडा येथे अमली पदार्थासह आंबेशेत येथील तरुणाला अटक

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्रीचा बीमोड करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील मिरकरवाडा येथे गस्त घालत असताना आंबेशेत येथील तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ३० हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दिनांक गुरुवारी रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात रत्नागिरी शहर पोलीस पथक गस्त करीत असताना, पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या उत्तर दिशेला 50 मिटर अंतरावर मोकळ्या मैदानात रात्री नऊ च्या सुमारास एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. गस्तीच्या पथकाने या इसमाचे जवळ जाऊन त्याला त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव न सांगता उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या पथकाने त्याला योग्य पोलीस बळाचा वापर करुन जागीच थांबविले व अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित राजेंद्र चव्हाण (35 वर्षे, मुळ रा. घर नं. 1391, आंबेशेत, ता.जि. रत्नागिरी) असे सांगितले तसेच लागलीच या पथका मार्फत दोन पंचांसमक्ष त्याची अंग झडती घेण्यात आली.

रोहित राजेंद्र चव्हाण याच्या अंगझडती मध्ये एक पांढऱ्या रंगाची पिशवी व त्यात एकूण 14 लहान व 3 मोठ्या प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या मिळून आल्या व त्यात काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला “गांजा” सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला. आरोपी रोहित राजेंद्र चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याच्याकडून एकूण 30,000 किमतीचा व 716 ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. या बाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 238/2025 एन.डी.पी.एस अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ई) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही, कामगिरी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर, व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पो.उ.नि. श्री. श्याम आरमाळकर, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, स.पो.फौ. / श्री. दीपक साळवी, पोहवा /574 श्री. अरुण चाळके, पोहवा /1399 श्री. अमोल भोसले, पोहवा /1112 श्री. आशीष भालेकर, पोहवा /1447 श्री. पंकज पडेलकर, पो.कॉ/484 श्री. अमित पालवे.