Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळुणात पकडलेला गुटखा आणला गोव्यातून

चिपळुणात पकडलेला गुटखा आणला गोव्यातून

चिपळुणातील एका बड्या व्यावसायिकाचा समावेश

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे पकडण्यात आलेला १६ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा गुटखा हा गोव्याहून आणला गेल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे तो चिपळुणातील गुटखा विक्री करणाऱ्या एका बड्या व्यावसायिकाला विकला जाणार होता. यातूनच या गुटख्याचे गोवा ते चिपळूण कनेक्शन असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणी सज्जन रामचंद्र निवेगी (३५, सावंतवाडी) या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. गुटखा खरेदीचे गोवा हे मुख्य केंद्र असून त्या ठिकाणाहून आणलेला गुटखा हा इतरत्र पाठवला जातो, हे आजवरच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. गुरुवारी कापसाळ येथे पकडण्यात आलेला १६ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा गुटखा हा देखील गोव्याहून आणला गेला आहे. तो चिपळुणातील एका बड्या व्यावसायिकाला देण्यात येणार होता. टेम्पो चालक सज्जन निवेगी याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती ही माहिती पुढे आली आहे. यातूनच या गुटख्याचे गोवा ते चिपळूण कनेक्शन असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा बडा व्यावसायिक कोण, त्याचे नाव अद्याप पुढे आले नसले तरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवारी पोलिसांनी गुटखा जप्तीची मोठी कारवाई केल्यानंतर शहरातील बहुतांशी पानटपरीवर गुटखा विक्री सुरुच असल्याचे दिसत होते.