रत्नागिरी:- आगामी काळात देशात होणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पुनर्रचनेमुळे कोकणातील मतदारसंघांची भौगोलिक आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संभाव्य बदल आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आतापासूनच संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे.
राजकीय जाणकारांमधील प्राथमिक चर्चेनुसार, आगामी पुनर्रचनेत लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची मोठी फेररचना होऊ शकते. चर्चेतील संभाव्य आराखड्यानुसार रत्नागिरी, चिपळूण, दापोली आणि गुहागर या चार विधानसभा मतदारसंघांचा मिळून एक स्वतंत्र ‘रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ’ तयार होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून नवा ‘सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ’ आकाराला येण्याची शक्यता आहे. मंडणगड आणि खेडचा काही भाग रायगड लोकसभा मतदारसंघाला जोडला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या संभाव्य बदलांची चाहूल लागताच भाजपने तळागाळातील संघटना भक्कम करण्याचे पाऊल उचलले आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिलेल्या अनुभवी पदाधिकाऱ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
रत्नागिरी मतदारसंघात भाजपची मोठी पारंपरिक मतपेढी असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. आगामी काळातील संभाव्य मतदारसंघ पुनर्रचना आणि निवडणुका लक्षात घेता, जुन्या नेत्यांचा दांडगा अनुभव आणि नव्या कार्यकर्त्यांची ताकद यांची सांगड घालून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.









