Saturday, November 21, 2026
spot_img
Home राजकीय ग्रामपंचायत निवडणुकांपासून सक्रिय उमेदवार घेऊन मैदानात उतरा

ग्रामपंचायत निवडणुकांपासून सक्रिय उमेदवार घेऊन मैदानात उतरा

प्रदेश सरचिटणीस रमेश किर यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांकडे लक्ष आवश्यक असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस रमेश किर यांनी व्यक्त केले. जिल्ह्याची रचना लक्षात घेता आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने सक्रियपणे उमेदवार उभे केले पाहिजेत. निवडणुकांच्या माध्यमातून मैदानात उतरल्यास लोकांचा राजकीय पाठिंबा वाढेल आणि पर्यायाने पक्षाची ताकदही वाढेल असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा काँग्रेस प्रभारी आकाश छाजेड यांनी एसआयआर प्रक्रियेतील हेराफेरी हाणून पाडा अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या.

काँग्रेस भवन येथे शनिवारी पार पडलेल्या काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस रमेश किर, माजी आमदारा हुस्नबानू खलिपे, जिल्हा प्रभारी आकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष जमीर खलीपे, शशांक बावस्कर, माजी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, प्रदेश महिला काँग्रेसच्या रूपालीताई सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील काही वर्षांत राज्यात आणि कोकणात भाजप तसेच त्यांच्या मित्रपक्षांच्या हुकूमशाही भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले असले, तरी अशा आव्हानात्मक परिस्थितीतही पक्षाला पुन्हा उभारी देणे गरजेचे आहे. सामान्य जनतेचा काँग्रेस पक्षावर आजही विश्वास कायम असून, कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन सर्वसामान्यांना पक्ष संघटनेशी जोडावे आणि पक्ष अधिक मजबूत करावा, असे ठाम आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस प्रभारी शशांक बावस्कर यांनी केले. रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे दक्षिण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मेळावा व आढावा बैठकीत ते बोलत होते.

​बेळगाव येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘संघटन सृजन’ उपक्रमाच्या माध्यमातून संघटनात्मक विस्तारासाठी कार्यकर्त्यांना दिलेल्या मार्गदर्शनाचा संदर्भ देत शशांक बावस्कर यांनी सांगितले की, याच धर्तीवर ॲड. जमीर खलिफे यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी आणि सोनललक्ष्मी घाग यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची कामगिरी दमदार असून, देशात सुरू असलेला तथाकथित मतचोरीचा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला आहे. गेल्या १२ वर्षांत देशात भाजपची सत्ता असतानाही बांगलादेशी घुसखोर कसे राहतात, असा सवाल उपस्थित करत एस.आय.आर. प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर संघटितपणे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
​या कार्यक्रमात रत्नागिरी काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित व उपस्थित जिल्हा प्रभारींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

​आपल्या मनोगतात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी आकाश छाजेड म्हणाले की, आपण स्वतः पूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले असल्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीतील आव्हाने आणि अडचणींची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. कोकणात शिवसेना आणि भाजपची सत्ता असूनही रत्नागिरी जिल्ह्यात आजही निष्ठावंत आणि कट्टर काँग्रेस कार्यकर्ते टिकून आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल, तर कार्यकर्त्यांनी एस.आय.आर. प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि मतदार याद्यांमध्ये कोणतीही हेराफेरी होऊ देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला.

​माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी पक्षांतर्गत अनुभवांवर भाष्य करताना सांगितले की, मागील काही काळात बाहेरून आलेल्या अनेकांचा समावेश कार्यकारिणीत करण्यात आला; मात्र तयार केलेली कार्यकारिणी घेऊनच काही लोक दुसऱ्या पक्षात गेल्याने रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. अलीकडे पार पडलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसने उमेदवार दिले आणि काही ठिकाणी चांगले यशही संपादन केले. येत्या काळात सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्यामध्ये काँग्रेसला निश्चितच चांगला प्रतिसाद व यश मिळेल. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केले. या बैठकीस संगमेश्वरचे काँग्रेस नेते अशोकराव जाधव, बरकत काझी, राजापूर तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, शहर अध्यक्ष अजीम जैतापकर, विश्वनाथ किल्लेदार, लक्ष्मीकांत मयेकर, गोपी वाघधरे, रामनाथ आढाव, सुधीर वायंगणकर, चंद्रशेखर कीर, नगरसेविका अफरोज झारी, नगरसेविका शबाना मुल्ला, सानिया पठाण, फिरोजा मुल्ला, यासिर बोबिरे, काशीराम वाजे, संतोष कांबळे, अशोक सखाराम जाधव, हबीब काझी, सुनील आंबुलकर, आसिफ खलिफे, अनिता शिंदे, अशपाक काद्री, प्रकाश जाधव, प्रदीप जाधव, शैबाज वाघू, शांताराम सुतार, नसीरुद्दीन बन्नीकोप, अशपाक झारी, दत्तात्रय परकार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.