Saturday, November 21, 2026
spot_img
Home क्रीडा जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला ३१ मार्च ‘डेडलाइन’

जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला ३१ मार्च ‘डेडलाइन’

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे कडक निर्देश

रत्नागिरी:- तब्बल १४ वर्षे उलटूनही जिल्हा क्रीडा संकुलाचे काम अद्याप अपूर्ण राहणे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. संथगतीने सुरू असलेल्या या कामाला आता गती द्यावी आणि ३१ मार्च २०२७ या अंतिम मुदतीपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, असे स्पष्ट आणि कडक निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हा क्रीडा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या संकुलाच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला. कामाच्या मंद गतीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, बांधकाम अपूर्ण असल्याचा गैरफायदा घेत संकुलाच्या इमारतीत अवैध धंदे सुरू असल्याची धक्कादायक बाब यावेळी समोर आली. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासन आणि क्रीडा विभागाला तातडीने कारवाई करण्याचे व परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे आदेश दिले.

क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट आणि इतर क्रीडा सुविधांचा वापर केवळ संबंधित खेळ आणि खेळाडूंच्या सरावासाठीच व्हावा; या वास्तूंचा इतर कोणत्याही कारणांसाठी वापर करू नये, अशी सक्त ताकीद डॉ. सामंत यांनी दिली. यासोबतच, साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेत, या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

रत्नागिरी येथे उभारण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून साकारणारे हे केंद्र संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलेच नाविन्यपूर्ण केंद्र ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, पायाभूत सुविधा आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.