रत्नागिरी:- श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. 17 ते 19 ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
अंतिम सामन्यात डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड आणि रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे पाटीलवाडी या दोन बलाढ्य संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. अंतिम चढाईपर्यंत रंगलेल्या या सामन्यात डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाला रोख 10 हजार 101 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेता रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे पाटीलवाडी संघाला रोख 7 हजार 101 रुपये व आकर्षक चषक मिळाला. मनोहर स्पोर्ट्स कोतवडे संघाने तृतीय क्रमांक मिळवत 2 हजार 101 रुपये व चषक, तर युवा प्रतिष्ठान पाली संघाने चौथा क्रमांक मिळवत 2 हजार 101 रुपये व चषक पटकावला.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट चढाईचा मान डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंडच्या वेदांत कांबळे यांना मिळाला. त्यांना रोख 1 हजार 101 रुपये व आकर्षक चषक देण्यात आला. उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळेच्या सागर कांबळे यांना, तर अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंडच्या साहिल रेवाळे यांना मिळाला. दोघांनाही रोख 1 हजार 101 रुपये व आकर्षक चषक देण्यात आला.
पहिल्या उपांत्य सामन्यात डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंडने मनोहर स्पोर्ट्स कोतवडेवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे पाटीलवाडीने युवा प्रतिष्ठान पालीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
या वर्षातील ही पहिली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा असून, श्री राधाकृष्ण वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा क्रीडारसिकांनी मोठ्या उत्साहात आनंद लुटला. बक्षीस वितरणला बक्षीस वितरण कार्यक्रमाला विजेत्या संघाला शरद रेडीज यांच्या स्मरणार्थ स्मित रेडीज आणि प्रथमेश रेडीजयांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजु , नगरसेवक सौरभ मलुष्टे, नगरसेवक केतन मलुष्टे, उद्योजक प्रवीण मलुष्टे, योगेश मलुष्टे, निलेश मलुष्टे, राजेश रेडीज, मिलिंद दळी, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, बाबा मयेकर,सचिन केसरकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वैश्य युवा रत्नागिरीचे वेदांत मलुष्टे आणि युवराज शेट्ये यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनातून आणि सहकार्यामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात यशस्वीपणे पार पडली.









