रत्नागिरी:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केलेल्या प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ आणि मिलिंद तुकाराम बनप यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त केले आहे.
दोघांना दर सोमवारी दुपारी ४ ते ५ या वेळेत संबंधित ठिकाणी हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या खटल्यात आरोपीतर्फे अॅ ड. प्रदीप नेने व अॅड. भाऊ शेट्ये यांनी न्यायालयात बाजू मांडली. शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (सुधारणा सन २०१८) च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल मुनीर करलेकर (रा. हयात नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, तक्रारदार करलेकर यांची फ्युजन मरीन एजन्सी नावाची शिपिंग कंपनी असून त्यांच्या मालकीच्या जहाजाला समुद्र बचावाची ‘पायपोटिंग’ दुरुस्ती परवानगी देण्यासाठी तसेच पॅसेंजर्स फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप होता. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी रत्नागिरी येथील रेस्टॉरंट बारमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी आरोपी क्रमांक २ मिलिंद बनप याने तक्रारदाराकडून ६० हजार रुपये लाच स्वीकारल्याचे नमूद आहे, तर आरोपी क्रमांक १ संदीप भुजबळ याने या रकमेबाबत तडजोड व पाठपुरावा केल्याचे कागदपत्रांत म्हटले आहे. दोन्ही आरोपींना करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.









