Thursday, November 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गुहागरमधील तरुणावर पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

गुहागर:- सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, तिने ८ नोव्हेंबर रोजी एका मुलाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर तालुक्यातील रानवी येथील समीर शशिकांत कांबळे (वय २९) या संशयित आरोपीविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, डिसेंबर २०२५ मध्ये तिची समीर कांबळे याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. दरम्यान, पीडिता अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही संशयिताने जानेवारी २०२६ मध्ये तिला गुहागर बाग समुद्रकिनारी फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर काही दिवसांनी संशयिताने तिला रानवी येथील जंगलमय भागात नेऊन पुन्हा अत्याचार केले, तसेच २ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा गुहागर बाग समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या वारंवार झालेल्या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली होती. गर्भधारणेनंतर ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर येथील रुग्णालयात तिची प्रसूती झाली असून, तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर पीडितेने हिंमत एकवटून समीर कांबळे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२), ६५(१), ३५१(२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) मधील कलम ४, ६, ८ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील कलम ३(२)(v), ३(१)(w)(i)(ii) आणि ३(२)(च) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर प्रकरणात पीडितेचा जबाब आणि वैद्यकीय कागदपत्रे महत्त्वाची ठरणार असून, गुहागर पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.