Friday, October 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवेंडी येथील मँगो पार्कचा मार्ग सुकर!

निवेंडी येथील मँगो पार्कचा मार्ग सुकर!

भूसंपादनाचा ८० कोटींचा मोबदला वाटप पूर्ण; ३०० जमीन मालकांना मिळाला दिलासा

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे आकारास येत असलेल्या बहुप्रतिक्षित ‘मँगो पार्क’ प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या सुमारे १०० हेक्टर जमिनीच्या मोबदला वाटपाचे काम तब्बल ७५ टक्के पूर्ण झाले असून, परिसरातील सुमारे ३०० जमीन मालकांना आतापर्यंत तब्बल ८० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित २५ टक्के मोबदला वाटपाची प्रक्रियाही वेगाने सुरू असून आगामी महिनाभरात ती पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

१०० हेक्टरवर उभारणार भव्य प्रक्रिया उद्योग
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निवेंडी येथे सुमारे १०० हेक्टर जागेवर भव्य ‘मँगो पार्क’ उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर प्रशासकीय पातळीवर भूसंपादन प्रक्रियेने मोठा वेग घेतला. कोकणातील समृद्ध हापूस आंबा, काजू, कोकम आणि फणस यांसारख्या स्थानिक फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग येथे उभारले जाणार आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
निवेंडी येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे फळ प्रक्रिया उद्योग दाखल झाल्यास कोकणातील आर्थिक चक्राला मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून महसूल यंत्रणेमार्फत पात्र खातेदारांच्या बँक खात्यात थेट मोबदला वर्ग केला जात आहे.

उर्वरित वाटप महिनाभरात पूर्ण होणार
आतापर्यंत ३०० हून अधिक जमीन मालकांना ८० कोटी रुपयांचा मोबदला यशस्वीरीत्या वितरित करण्यात आला आहे. सध्या उर्वरित जमीन मालकांच्या कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी व खातेवाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिनाभरात संपूर्ण भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रिया १०० टक्के पूर्ण होईल, असा ठाम विश्वास महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.