Thursday, October 8, 2026
spot_img
Home चिपळूण तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा 

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा 

चिपळूण:-  तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील १७ वर्षीय साहिल सुरेश भागडे या अल्पवयीन मुलाने गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी साहिलने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, गावातीलच तिघांच्या जाचाला व झालेल्या बदनामीला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात एकाच गावातील तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०७ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पांडुरंग विठ्ठल शेलार (वय ३५), अंजली पांडुरंग शेलार आणि अनिल बळीराम पवार (वय ३८, सर्व रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल भागडे याने गळफास घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा केला. त्यावेळी साहिलच्या जीन्स पॅन्टच्या मागच्या उजव्या खिशात पोलिसांना एक सुसाईड नोट मिळून आली. त्या चिठ्ठीमध्ये नमूद केल्यानुसार, आरोपी महिला अंजली शेलार ही डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या वहाळ येथील रुग्णालयात कामाला असताना साहिलचा मोबाईल फोन वापरायची. १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान ती साहिलच्या फोनवरून अनिल पवार याच्याशी बोलत असताना तिचा पती पांडुरंग शेलार याने तिला रंगेहात पकडले. या प्रकारानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी पांडुरंग आणि अंजली या दोघांनी हा सर्व प्रकार साहिलमुळेच घडल्याचा बनाव रचून खापर त्याच्यावर फोडले.

एवढ्यावरच न थांबता, पांडुरंग शेलार याने साहिलला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला. यामुळे संपूर्ण गावात साहिलची नाहक बदनामी होऊन त्याची बेइज्जत झाली. संशयित आरोपी पांडुरंग शेलार, अंजली शेलार आणि अनिल पवार या तिघांनी संगनमताने केलेल्या या छळामुळे आणि गावात झालेल्या अपमानामुळे मानसिक तणावाखाली येऊन साहिलने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सृष्टी सुधाकर भागडे (वय २९, रा. वहाळ घडशीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावर्डे पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.