Monday, October 5, 2026
spot_img
Home राजापूर राजापूरमध्ये दुभाजक ओलांडून कंटेनर पलटी

राजापूरमध्ये दुभाजक ओलांडून कंटेनर पलटी

क्लिनरसह चालक जखमी

राजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर हद्दीत मद्यप्राशन करून अतिवेगात आणि बेदरकारपणे कंटेनर चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहन आणि महामार्गाचे नुकसान झाले असून, चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत ज्योती चव्हाण (वय २९, रा. राजारामपुरी ३ री गल्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मूळ रा. आक्कोल, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी पहाटे १:४८ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा ते मुंबई दिशेने अशोक लेलॅन्ड कंपनीचा कंटेनर (क्र. एमएच ४३ सीके ६८७२) चालवून नेत असताना, गंगातीर्थ फाट्यापुढे वक्रतुंड हॉटेलसमोर आरोपी चालकाने रस्त्याची परिस्थिती न पाहता मद्यप्राशन करून, अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालवले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर हायवेवरील दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन उजव्या बाजूला पलटी झाला.
या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून चालक व सोबत असलेला क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर आरोपी चालक रणजीत चव्हाण हा अपघाताची कोणतीही सविस्तर माहिती न देता तसेच अपघातग्रस्त वाहन व रस्त्यावरील सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता घटनास्थळावरून निघून गेला.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल बापुराव महादेव काटे (नेमणूक राजापूर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.