जवळेथर-मिळंद येथील घटना
राजापूर:- तालुक्यातील जवळेथर-मिळंद गावच्या सीमेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या स्कूटीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्कूटीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास जवळेथर ते पाचल जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर घडला. आरोपी गौरव गजानन पवार (वय ३६, रा. वरचीपेठ, राजापूर) हा आपल्या ताब्यातील ‘साई तन्मय ट्रव्हल्स’ची बस (क्र. MH 01 EV 5495) भरधाव वेगाने चालवत होता. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता त्याने ट्रॅव्हल्स राँग साईटला नेली.
यावेळी समोरून येणाऱ्या हिरो प्लेझर स्कूटीला (क्र. MH 08 AW 5348) ट्रॅव्हल्स चालकाने धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटीस्वार स्वरूप सुहास सप्रे (वय ३४, रा. जवळेथर, सुर्वेवाडी, ता. राजापूर) या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या स्कूटीचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी श्रीमती स्मिता सुहास सप्रे (वय ६२, रा. जवळेथर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून आरोपी ट्रॅव्हल्स चालक गौरव पवार याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.









