Monday, July 27, 2026
spot_img
Home चिपळूण दुचाकी-आयशर ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

दुचाकी-आयशर ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

डेरवण फाटा येथील घटना

सावर्डे:- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील डेरवण फाटा परिसरात रविवारी दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला तातडीने डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.

दरम्यान, डेरवण फाटा हा सातत्याने अपघातांचा केंद्रबिंदू ठरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार यांनी प्रशासनाला इशारा देत, “डेरवण फाट्यावर तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

वारंवार होणारे अपघात, वाढती वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे डेरवण फाटा आता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत असून, आणखी एखादा जीव जाण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.