Monday, May 25, 2026
spot_img
Home चिपळूण ‘त्या’ बेपत्ता बँक कर्मचाऱ्याचा धरणात सापडला मृतदेह; सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला ४...

‘त्या’ बेपत्ता बँक कर्मचाऱ्याचा धरणात सापडला मृतदेह; सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला ४ जणांवर गुन्हा

चिपळूण:- येथील एका बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय युवक मुकुंद मुरलीधर पालांडे याचा मृतदेह तीन दिवसांनंतर कोळकेवाडी-हसरेवाडी स्मशानभूमीलगतच्या धरण परिसरात सापडला आहे. या घटनेमुळे चिपळूण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुकुंद याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली असून, यामध्ये त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुकुंद पालांडे हा तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस आणि त्याचे नातेवाईक त्याचा सातत्याने शोध घेत होते. अखेर तीन दिवसांच्या अथक शोधानंतर कोळकेवाडी धरणाच्या पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

​मुकुंद बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांना त्याची ४ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने आपल्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्या लोकांचा सविस्तर उल्लेख केला आहे. मानसिक छळ आणि जाचाला कंटाळूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे अलोरे शिरगाव पोलिसांनी तातडीने पावले उचलत, मुकुंदला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

​या धक्कादायक घटनेमुळे पालांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील करत आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.