येळवण येथे दुचाकी अपघातात वृध्दाचा मृत्यू

पाचल:- राजापूर तालुक्यातील येळवण परिसरात दुचाकी अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विकास बाबूराव शिर्के (वय ६३, रा. येळवण, बांबरवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी विकास शिर्के हे आपल्या शेतातील विहिरीच्या कामासाठी वेळवण येथे आले होते. दिवसभर काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते आपल्या मोटारसायकलने गावाकडे निघाले.

दरम्यान, सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रायपाटण गावाजवळ वडवई मंदिरासमोरील रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. मोटारसायकल चालवत असताना अचानक चक्कर आल्याने त्यांचा ताबा सुटून ते रस्त्यावर पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची घटना समजताच रायपाटण दूरक्षेत्रचे सहाय्यक उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पो. कॉ. राम लक्ष्मण कात्रे (अण्णा), पो. कॉ. रामदास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.