कान्हे येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता राजेश कदम (वय ३५, रा. कान्हे कदमवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:४५ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. श्वेता यांनी आपल्या राहत्या घरातील माजघरात लोखंडी आय-बीमला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्या मयत स्थितीत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. २९ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस.१९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आ.मृ. क्रमांक ०७/२०२६) म्हणून नोंद केली असून, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्वेता कदम यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.