Wednesday, May 27, 2026
spot_img
Home राजापूर मुसाकाझी बंदरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

मुसाकाझी बंदरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

राजापूर:- राजापूर तालुक्यातील मुसाकाझी बंदर परिसरात एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुसाकाझी येथील पोलीस पाटील निधी विकास बांदकर हे २४ मार्च रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘सजग अभियान’ अंतर्गत बंदराच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर होते. यावेळी त्यांना मुसाकाझी बंदराच्या जुन्या बंदर विभागाच्या कार्यालयाच्या खालच्या बाजूला समुद्रकिनारी एक व्यक्ती पालथ्या अवस्थेत पडलेली दिसली. जवळ जाऊन खात्री केली असता, तो अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुष असल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

​पोलीस पाटील यांनी तातडीने या घटनेची माहिती राजापूर पोलिसांना दिली. २४ मार्च, दुपारी १२ वाजता बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आमू. क्रमांक ०९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

​मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर व्यक्तीचे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असून, तो मुसाकाझी समुद्रकिनारी मृतावस्थेत मिळून आला आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास राजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.