Friday, May 1, 2026
spot_img
Home राजकीय गुहागर पं. स. सभापतीपदी प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी निलेश सुर्वे

गुहागर पं. स. सभापतीपदी प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी निलेश सुर्वे

गुहागर:- गुहागर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने बाजी मारली आहे. सभापतीपदी शिवसेनेचे (शिंदे गट) प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

​गुहागर पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीची सत्ता आहे. शिवसेनेने निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

कोंडकारुळ गावचे सुपुत्र असलेले प्रणव पोळेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेने आणि दांडगा जनसंपर्कामुळे पक्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तर भाजपचे निलेश सुर्वे यांनीही आपल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे हे पद मिळवले आहे.

नूतन सभापती आणि उपसभापतींनी आपल्या निवडीनंतर तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीमुळे तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

​निवडीची घोषणा होताच गुहागर शहरासह तालुक्याच्या विविध भागांत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नूतन सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांच्यावर सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.