शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ४२ हजार रुपये किमतीचा ३.५ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
अयुब निजाम कोतवडेकर (वय २९, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी (ता. ४) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात नियमित गस्त घालत असताना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूस एक तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत ३.५ ग्रॅम वजनाचा खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉइनसदृश अंमली पदार्थ आढळून आला. प्लास्टिक पिशवीसह त्याचे एकूण वजन ६.५ ग्रॅम होते. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ४२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुद्देमाल जप्त करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल निलेश शिंगवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रविवारी (ता. ५) त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस हवालदार भालचंद्र मयेकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.









