Sunday, May 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पाली-साखरपा एसटी प्रवासात महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

पाली-साखरपा एसटी प्रवासात महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

लांजातील महिलेची पोलिसांत तक्रार

रत्नागिरी:- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी आता पाली-साखरपा मार्गावर आपली नजर वळवली आहे. पाली एसटी स्टँड ते मुर्शी साखरपा प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत चलाखीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना १३ मे रोजी सकाळी ७:३० ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी करुणा कैलास साळवी (वय ४३, व्यवसाय- घरकाम, रा. मठ कुंभारवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे.

घटनेच्या दिवशी करुणा साळवी या पाली एसटी स्टँडवरून मुर्शी साखरपा येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्याकडे एक काळ्या-पांढऱ्या रंगाची कापडी पर्स होती. या पर्सच्या आतल्या कप्प्यामध्ये त्यांनी एक छोटी पर्स ठेवली होती, ज्यामध्ये त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र सुरक्षित ठेवले होते.

एसटी प्रवासातील गर्दीचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी साळवी यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी कापडी पर्स उघडून आतील छोट्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. बसमधून उतरल्यानंतर साळवी यांना आपली चोरी झाल्याचे लक्षात आले.

​या चोरीच्या घटनेनंतर करुणा साळवी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून १५ मे रोजी सायंकाळी ७:३१ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून एसटी बसमधील संशयितांचा शोध घेतला जात आहे.