Saturday, May 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मद्यधुंद वॅगनआर चालकाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

मद्यधुंद वॅगनआर चालकाची दुचाकीला जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील आबलोली ते वहाळफाटा मार्गावर निवळी स्टॉपजवळ बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव वेगात वॅगनआर कार चालवणाऱ्या चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार व्यापारी गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुयोग सुरेंद्र सुर्वे (वय ३९, रा. निवळी कोंडवाडी) हे आपल्या मालकीची मोटरसायकल (क्र. MH 08 AY 0182) घेऊन आबलोली-वहाळफाटा रस्त्याने घराकडे जात होते. रात्री ९:५० च्या सुमारास ते निवळी स्टॉपजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या वॅगनआर कारने (क्र. MH 02 EP 0478) त्यांना जोरदार धडक दिली.

घटनेवेळी कार चालक सूर्यकांत दत्ताराम लाड (वय ५६, रा. ढाकमोली) हा दारूच्या नशेत होता. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी विरुद्ध दिशेला नेली आणि समोरून येणाऱ्या सुर्वे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेमुळे सुयोग सुर्वे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

​याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपी चालक सूर्यकांत लाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ५१/२०२६ नुसार नोंदवण्यात आला आहे.